सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. संकुलात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. अध्यापक महाविद्यालय आणि आर. के. विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी ठीक ७:३० वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आर. के. विधी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री. गायकवाड सर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या निनादाने संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून गेला होता.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड सर म्हणाले, “कायद्याचे शिक्षण घेताना केवळ पदवी मिळवणे हा आपला उद्देश नसून, समाजातील सर्वसामान्य, शोषित आणि गोरगरीब जनतेला सुलभ न्याय मिळवून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. भावी वकिलांनी वकिली व्यवसायाकडे केवळ एक साधन म्हणून न पाहता, सामाजिक न्यायाचे माध्यम म्हणून पाहावे.”
आर. के. अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. खिलौनी राऊलकर यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनातून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील भारताची गरज या तिन्ही घटकांचा सुंदर समन्वय साधला. त्या म्हणाल्या, “शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार असतो. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे जबाबदार नागरिक बनवण्याचे सामर्थ्य भावी शिक्षकांमध्ये आहे. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शैक्षणिक प्रगती आणि मूल्यांची जपणूक अत्यंत आवश्यक आहे.”
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन आणि भाषणांच्या माध्यमातून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.विधी महाविद्यालयाचे विद्यार्थि निलेश आचरेकर यांनी ‘भारतीय संविधान आणि नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर प्रभावी भाषण केले, तर अध्यापक महाविद्यालयाचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी श्री. नामदेव कांबळे याने ‘स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांचे योगदान आणि आजचा युवक’ यावर आपले विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आणि ‘जय हो’ या गीतांवर देशभक्तीपर समूहगीत सादर करून उपस्थितांची मन जिंकली.
विधी शाखेचा विद्यार्थी समीर आचरेकर याने सद्याची स्वतंत्र स्थिती या विषयावर आपले विचार व्यक्त केले. अध्यापक महाविद्यालयाचे कुमारी दीप्ती डेरे यांनी महिलांचे अधिकारी आणि त्यांचा सहभाग यावर विचार मांडले तर डी एड प्रशिक्षणार्थी यांनी स्वतंत्रपर आधारित समूह गीत गायन केले.कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांचे सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्राजक्ता लोहार यांनी केले, विधी विभागामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचे बक्षीस व प्रमाणपत्र विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरणचे सूत्रसंचलन प्राध्यापक अक्षता पवार यांनी केले यावेळी वीर सावरकरांचे देशभक्तीपर. विचार सांगताना , देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो.अशा शब्दांत रोहन महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.अल्पोपहार आणि मिष्टान्न वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.


